India Morning News
मुंबई:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या १८ प्रकारच्या व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द केल्याची घोषणा केली आहे. यानंतर अमित शाह यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कोणताही पाकिस्तानी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतर भारतात थांबू नये आणि त्यांना शोधून मायदेशी पाठविण्यात यावे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यातील ४८ शहरांमध्ये एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक २४५८ पाकिस्तानी असल्याचे उघड झाले असून, ठाणे शहरात ११०६ व मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक असल्याची नोंद झाली आहे. यातील फक्त ५१ जणांकडे वैध व्हिसा व इतर कागदपत्रे आहेत.
विशेष म्हणजे, १०७ पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा सध्या अज्ञात आहे. पोलिस किंवा संबंधित संस्थांना त्यांचा शोध लागलेला नाही.
योगेश कदम यांचे स्पष्टीकरण
योगेश कदम यांनी सांगितले की, राज्यात आढळलेले काही पाकिस्तानी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही येथे थांबले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अनेक जण सापडत नाहीत. सार्क व्हिसा किंवा अल्पकालीन व्हिसावर आलेल्यांना २८ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय कारणास्तव आलेल्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अजूनही माहिती संकलन सुरू असल्याने आकडेवारीत काही बदल होऊ शकतो.
फडणवीसांचा इशारा : कारवाई युद्धपातळीवर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, प्रत्येक पोलिस ठाण्याला संबंधित पाकिस्तानी नागरिकांची यादी पुरवण्यात आली आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा जास्त महाराष्ट्रात थांबू नये यासाठी काटेकोर नजर ठेवली जात आहे. जर कुणी नियम तोडताना आढळला तर त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र राहण्याची गरज आहे आणि उघड्या डोळ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे.








Comments are closed