India Morning News
मुंबई : दिवाळीचा उत्साह आणि ऑक्टोबर हीट या दोन्हींच्या संगमात आता पावसानेही आपली एन्ट्री घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा ढगाळ हवामान निर्माण झालं असून तापमानात वाढ झाल्याने वातावरण पावसासाठी अनुकूल बनलं आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस महाराष्ट्रात अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
२२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिवाळीच्या काळातच या मुसळधार सरींची शक्यता वर्तवली गेल्याने नागरिकांना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावं लागणार आहे.
आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
२४ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणासह गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही विजांच्या कडकडाटासह सरी पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात विजांसह पाऊस पडेल.
दिवाळीच्या सणात गारवा आणि पावसाचा मिलाफ पाहायला मिळणार असून, हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.









