India Morning News
मोहोळ:मोहोळ नगराध्यक्षपदाच्या रिंगणात पोस्टरबाजी, रंगीत रॅली, ध्वनीक्षेपकांची गर्दी आणि खर्चाच्या स्पर्धेला बाजूला सारत सौ. प्रीतीताई राजन घाडगे यांनी साधेपणाचा नवा आयाम निर्माण केला आहे. ना मोठे बॅनर, ना गोंगाट करणारे ताफे; फक्त घरट्या-घरट्यांत थेट जाऊन मतदारांशी प्रामाणिक संवाद साधण्याची त्यांची शैली मोहोळकरांच्या मनात घर करून गेली आहे.
“चावी” या निवडणूक चिन्हासह प्रीतीताई स्वतः फिरत आहेत. महिलांच्या अडचणी, तरुणांच्या अपेक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि व्यावसायिकांच्या प्रश्नांना त्या मन लावून ऐकतात आणि आपल्या विकासाच्या प्राधान्यांची थेट माहिती देतात.
“नेत्यानं प्रथम लोकांशी विश्वासाचं नातं जोडलं पाहिजे. ते पोस्टरवरून नव्हे, तर डोळ्यांत डोळे घालून बोलल्यावरून तयार होतं. हाच माझ्या प्रचाराचा गाभा आहे,” असे त्या ठामपणे सांगतात.
अनावश्यक खर्च टाळूनही प्रभावी प्रचार कसा करता येतो, याचं उत्तम उदाहरण प्रीतीताईंनी घालून दिलं आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या साध्या पण हृदयस्पर्शी प्रचाराची जोरदार चर्चा सुरू आहे. “हा खराखुरा जनतेचा प्रचार” अशा शब्दांत अनेकजण त्यांचं कौतुक करीत आहेत.
गोंगाटात नव्हे, तर शांत आणि मनापासून बोललेल्या शब्दांतच खरी लोकशाही जिवंत राहते, हा संदेश प्रीतीताई घाडगे यांच्या प्रचाराने मोहोळला दिला आहे.


