Shopping cart

  • Home
  • News
  • मुंब्रा-दिवा दरम्यान रेल्वे अपघात; धावत्या लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

मुंब्रा-दिवा दरम्यान रेल्वे अपघात; धावत्या लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

June 9, 20250 Mins Read
39

India Morning News

Share News:
Share

ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान सोमवारी (९ जून) सकाळी भीषण दुर्घटना घडली. धावत्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले, यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सीएसएमटीकडून कसाऱ्याकडे जाणारी फास्ट लोकल आणि कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे येणारी दुसरी लोकल एकमेकांच्या समोरून जात असताना हा अपघात घडला. यावेळी प्रवाशांची गर्दी अत्याधिक होती. दोन लोकल एकमेकांच्या अगदी जवळून जात असताना आठ प्रवासी ट्रेनमधून खाली पडले.

या अपघातात सात पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीमुळे आणि लोकलच्या वेगामुळे प्रवासी संतुलन राखू शकले नाहीत आणि ट्रॅकवर कोसळले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी सांगितले की, “दुर्घटना घडल्यानंतर गार्डने लगेच माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा आणि दिवा येथून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं.”

दरम्यान, या अपघातामुळे स्थानिक रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. अपघाताच्या कारणांची चौकशी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेतील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, गर्दीच्या तासांत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share