Shopping cart

  • Home
  • News
  • राष्ट्रवादी गुंडांची टोळी, अजित पवार त्यांचे आका? : हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

राष्ट्रवादी गुंडांची टोळी, अजित पवार त्यांचे आका? : हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

May 22, 20251 Mins Read
275

India Morning News

Share News:
Share

मुंबई:भाजप-शिवसेना-अजित पवार गटाच्या महायुती सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून, सत्ताधारी पक्षांशी संबंधित व्यक्तींचा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मोठा सहभाग असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गुंडांची टोळी बनली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. तसेच, राज्य महिला आयोगाच्या असंवेदनशील वृत्तीवरही त्यांनी तीव्र टीका केली.

मुंबईतील गांधीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “बीडमधील मस्साजोग प्रकरण, पुण्यातील पौर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह प्रकरण, कोयता गॅंग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक शोषण करणारे शंतनू कुकडे आणि त्यांचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर, तसेच वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी छळ करणारे राजेंद्र हगवणे हे सर्व राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणांमागे अजित पवार यांच्या पक्षाचे लोक कसे? सत्ताधाऱ्यांचे अभय असल्याने अशी घृणास्पद कृत्ये होत आहेत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महिला आयोगावर टीकास्त्र

राज्य महिला आयोगाच्या असंवेदनशीलपणावरही सपकाळ यांनी टीका केली. “महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती, तर वैष्णवी हगवणेसारख्या निष्पाप जीवाचा बळी गेला नसता. आयोगाच्या अध्यक्षांना महिला सुरक्षेपेक्षा राजकारणात जास्त रस आहे,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

अर्जुन खोतकर, पीएच्या अटकेची मागणी

धुळे येथे विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीतून जवळपास दोन कोटींची रक्कम जप्त झाल्याचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला. “ही रक्कम कंत्राटदारांकडून उकळल्याची चर्चा आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल, तर खोतकर आणि त्यांच्या पीएवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच शिंदे गटातील सर्व आमदारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ईडी आणि आयकर विभागामार्फत चौकशी करावी, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बोगस बियाण्यांचा मुद्दा

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याकडेही सपकाळ यांनी लक्ष वेधले. “हजारो हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, पण सरकारकडून पंचनामेही होत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली. खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे आणि खतांचा सुळसुळाट झाला असून, विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. यावर सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

महायुती सरकार भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या आहारी गेले असून, जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष आक्रमकपणे लढेल, असा इशारा सपकाळ यांनी दिला.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share