India Morning News
पंढरपूर:-आषाढी वारीच्या पावन पर्वाला साजेशी पंढरपूर नगरी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्रालय तसेच सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘महास्वच्छता अभियान’ यशस्वीपणे राबविण्यात आले. या अभियानात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
दरवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. यंदा त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे अस्वच्छतेमुळे होणारा रोगप्रसाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होणार असून, वारकऱ्यांना स्वच्छ, कचरामुक्त आणि निरोगी वातावरणात वारीचा आनंद घेता येणार आहे.
या अभियानात केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आयुक्त ओंबाशे साहेब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या सामूहिक प्रयत्नांतून शासनाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रकर्षाने जाणवली.
या अभियानाच्या माध्यमातून पंढरपूर शहरात स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात आला. यामुळे केवळ वारकऱ्यांनाच नव्हे, तर स्थानिक नागरिकांनाही स्वच्छ आणि सुंदर परिसराचा लाभ होणार आहे. शासनाने वारकऱ्यांच्या आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेची हमी घेत आपली कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या महास्वच्छता अभियानाला स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वच्छतेच्या या पवित्र कार्यात सहभागी होऊन त्यांनी पंढरपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला साजेसे योगदान दिले. अभियानात सहभागी प्रत्येकाने स्वच्छतेच्या महत्त्वावर भर देत, यापुढेही अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
जिल्हा प्रशासनाने यापुढेही आषाढी वारीदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी नियमित उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे पंढरपूर नगरी स्वच्छ, सुंदर आणि वारकऱ्यांसाठी अधिक आकर्षक बनणार आहे.
‘स्वच्छ पंढरपूर, निरोगी वारकरी’ हा संदेश घेऊन राबवलेल्या या अभियानाने आषाढी वारीच्या पावित्र्याला एक नवा आयाम दिला आहे.










Comments are closed