India Morning News
मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शब्दबाण सोडले आहेत. “बेगानी शादी में ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय?” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंना टोला लगावत, ठाकरे बंधूंमधील युतीच्या चर्चांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असा इशाराही दिला.
“तुम्ही भाजपात जायचं ठरवलं, मग आमचं आम्ही काय करावं हे तुम्हाला का त्रास देतंय? आम्ही कुणासोबत युती करावी हे आमचं ठरवायचं. तुम्ही या विषयात का नाचता?” असा थेट सवाल राऊतांनी केला.
गुवाहाटीचे ‘कापलेले रेडे’ आणि अघोरी टीका
राऊत यांनी शिंदेंच्या गुवाहाटी उठावाची खिल्ली उडवत म्हटलं, “गुवाहाटीत कापलेले रेडे भविष्यात काही देणार नाहीत. अघोरी पूजेसारख्या गोष्टींचा काही उपयोग होत नाही. तुमच्या फुटलेल्या शिंगांनी काही साध्य होत नाही.
त्याचबरोबर त्यांनी भाजपशी असलेल्या शिंदेंच्या संबंधांवरही जोरदार टीका केली. “तुमचं फडणवीसांनी काय हाल केलंय ते पाहा. तुम्हाला पायपुसण्यासारखं वापरलं. आता झोप लागत नाही म्हणून तळमळताय,” असेही ते म्हणाले.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवर विश्वास
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर बोलताना राऊत म्हणाले, “ठाकरे बंधू एकमेकांशी सल्लामसलत करून योग्य निर्णय घेतील. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी ही एकजूट गरजेची आहे. ‘ठाकरे ब्रँड’ हा देशातील सर्वोच्च राजकीय ब्रँड आहे. त्याला कुणीही डॅमेज करू शकत नाही – ना फडणवीस, ना शिंदे, ना अमित शाह. शेवटी, भाजपच्या भूमिकेवर टीका करताना राऊतांनी म्हटलं, “मराठी पक्ष एकत्र येण्याची शक्यता पाहून काहींना अस्वस्थता जाणवत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, फडणवीस यांना ही एकजूट नको आहे. तुमच्या पक्षाला जर बूट चाटायला लोक कमी पडत असतील, तर आम्ही पाठवू!”
राज ठाकरे अजून निर्णय घेत नसल्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं की,मुंबई आणि महाराष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वच पावलं काळजीपूर्वक उचलली जात आहेत.










Comments are closed