India Morning News
मुंबई : महाराष्ट्रात “वंदे मातरम” गाण्याबाबतचा नवा वाद पेटला आहे. राज्य सरकारने शाळांमध्ये ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान “वंदे मातरम” ची संपूर्ण आवृत्ती गाण्याचे आदेश दिल्यानंतर समाजवादी पक्षाने या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २७ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या “वंदे मातरम” गाण्याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने सर्व शाळांनी हे गीत पूर्ण स्वरूपात गावे आणि त्याचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगावा.
तथापि, या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी म्हणाले, “वंदे मातरम गाणे बंधनकारक करू नये. प्रत्येक धर्माचे श्रद्धास्थान वेगळे असते, म्हणून हे गाणे अनिवार्य करण्याची गरज नाही.”
दरम्यान, भाजपने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे राज्य मीडिया प्रमुख नवनाथ बान यांनी म्हटले, “अबू आझमींना वंदे मातरम गाणे नको असेल तर त्यांनी पाकिस्तानला जावे. या देशात राहायचे असेल तर राष्ट्रगीताचा आदर करावाच लागेल.”
या विधानांनंतर “वंदे मातरम” विषयावरून राज्यात पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम मतभेदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिक्षण विभाग मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून, १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्व शाळांनी राष्ट्रगीत गावेच, असा त्यांचा आग्रह आहे.










