India Morning News
मुंबई : अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील सर्व सहभागी रुग्णालयांना १ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत.
वरळी येथील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी ही घोषणा केली. ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत रुग्णालयांनी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अपघातानंतर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. उपचाराच्या प्रतीक्षेत कुणाचाही जीव जाऊ नये, हीच आपली प्राथमिकता आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना तात्काळ आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेतला आहे,असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
त्यांनी यावेळी रुग्णालयांना देखील आवाहन केले की, त्यांनी या योजना प्रभावीपणे राबवून रुग्णसेवेस प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही अपघातग्रस्ताला वैद्यकीय उपचारांपासून वंचित ठेवू नये.
हा निर्णय राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक असून, अपघातानंतर लागणाऱ्या तातडीच्या उपचारांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.










Comments are closed