India Morning News
मुंबई – मिठी नदीतील गाळ सफाईच्या कंत्राटात झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याने गुरुवारी सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली. त्याच्यासोबत त्याचा भाऊ सेन्टिनो मोरिया देखील उपस्थित होता.
या प्रकरणात डिनो मोरिया व त्याच्या काही आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु असून, त्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. याअगोदर १४ जून रोजीही डिनो व त्याच्या भावाची ईडीकडून साडेचार तास चौकशी झाली होती.
ईडीने यापूर्वी डिनो मोरिया याच्या वांद्रे येथील निवासस्थानासह मुंबई व कोचीतील १५ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती हस्तगत करण्यात आली. त्यानंतर आठ जणांना समन्स बजावण्यात आले असून, डिनो त्यातील एक आहे.
प्रकरणाचा तपास करताना ईडीने मिळालेल्या पुराव्यांवरून असे स्पष्ट झाले आहे की, आरोपी केतन कदम व डिनो मोरिया यांच्यात २०१९ ते २०२२ या कालावधीत काही आर्थिक देवाणघेवाण झाली होती. दोघांमध्ये जवळपास २५ वर्षांची ओळख असल्याचेही समोर आले आहे.
या गैरव्यवहारात महापालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी आणि दोन कंपन्यांचा समावेश आहे. आरोपींनी संगनमत करून मुंबई महापालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
या संदर्भात आझाद मैदान पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींमध्ये प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, निवृत्त अभियंता तायशेट्टे, तसेच अॅक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे प्रमुख आणि मध्यस्थांचा समावेश आहे.
सध्या ईडी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आर्थिक व्यवहार, मालमत्तांचे स्रोत व त्याचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.






Comments are closed