India Morning News
नवी दिल्ली:पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या युद्धविराम असला तरी भविष्यात परिस्थिती कशी असेल, याचा नेम नाही. अशा पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यासाठी एक सकारात्मक घडामोड समोर आली आहे. केंद्र सरकारकडून संरक्षण क्षेत्रासाठी अतिरिक्त 50,000 कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या निधीतून अत्याधुनिक हत्यारांची खरेदी, संशोधन व विकास, तसेच तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. माध्यमांतील अहवालानुसार, हिवाळी अधिवेशनात हा पुरवणी अर्थसंकल्प मंजुरीसाठी सादर होणार आहे.
या आर्थिक वर्षात सरकारने आधीच 6.81 लाख कोटी रुपयांचे संरक्षण बजेट जाहीर केले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 9.5 टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे, 2014 मध्ये एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून संरक्षण खर्चात तिप्पट वाढ झाली आहे.
ऑपरेशन सिंदूरने दाखवली भारताची ताकद
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा बळी गेला. यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलत 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या मोहिमेत भारतीय लष्कर, हवाई दल व नौदलाने समन्वयाने काम करत पाकिस्तान व POK मधील दहशतवादी ठिकाणांवर अचूक प्रहार केला.
या कारवाईत भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद दिसून आली. एस-400 ट्रायम्फ, बराक-8, आकाश, पेचोरा, ओएसए-एके आणि एलएलएडी सारख्या यंत्रणांचा प्रभावी वापर करत भारताने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना निष्फळ ठरवलं.
युद्धविराम लागू, पण सतर्कतेचा इशारा-
7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तानकडून श्रीनगर, पठाणकोट आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला, परंतु भारतीय संरक्षण दलांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. सद्यस्थितीत युद्धविराम जाहीर करण्यात आला असला तरी, सरकारकडून सैन्य सज्ज ठेवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत










Comments are closed