India Morning News
अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनला रवाना झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 737-8 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात झाला असून, त्यात २६५ जणांचा जीव गेला. अपघातानंतर घटनास्थळी शोधमोहीम सुरू असून, त्यात चौकशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा ‘ब्लॅक बॉक्स’ अखेर सापडला आहे. या घटनेने चौकशी प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय?
‘ब्लॅक बॉक्स’ हे नाव जरी काळ्या रंगाचं वाटत असलं, तरी प्रत्यक्षात ते चटकदार केशरी रंगाचं असतं, जे शोधण्यास सोपं जावं म्हणून. या यंत्रात विमानातील महत्त्वाची तांत्रिक माहिती आणि पायलट्समधील संभाषणाची नोंद असते. ते अपघातानंतर कारणमीमांसा करण्यात मोठी मदत करतं.
हे यंत्र दोन भागांमध्ये विभागलेलं असतं
डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR)
विमानाचा वेग, उंची, इंजिनचा जोर, हवामानातील बदल आणि इंधनाचा वापर यासारखा डेटा यामध्ये सतत रेकॉर्ड केला जातो.
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)
पायलट आणि को-पायलटमधील संभाषण, तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेला संवाद यात जतन होतो.
पाण्यात सुद्धा सापडतो
जर विमान समुद्रात कोसळलं, तरी ब्लॅक बॉक्समधील ‘अंडरवॉटर लोकेटर बीकन’ ३० दिवस सिग्नल पाठवत राहतो. त्यामुळे खोल पाण्यातही त्याचा शोध घेणं शक्य होतं. आजकालच्या विमानांमध्ये सॉलिड स्टेट मेमरीचा वापर केल्यामुळे यामधील माहिती अधिक टिकाऊ आणि स्पष्ट राहते. त्यामुळे अपघाताच्या नेमक्या कारणांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होते. ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर विमान कंपनी, नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) आणि तज्ञ अधिकाऱ्यांनी तपासाची दिशा ठरवण्यास सुरुवात केली आहे. या रेकॉर्डिंगद्वारे अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.










Comments are closed