Shopping cart

  • Home
  • News
  • स्कूल बस सुरक्षा नियमावलीत सुधारणा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

स्कूल बस सुरक्षा नियमावलीत सुधारणा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

May 8, 20250 Mins Read
305

India Morning News

Share News:
Share

मुंबई: स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली.

“स्कूल बसचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असे सरनाईक यांनी ठामपणे सांगितले. नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “नियमांचे पालन केवळ कायद्याच्या भीतीपोटी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही, मात्र नियम शिथिलही केले जाणार नाहीत, असे सरनाईक यांनी नमूद केले. नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण मिळणार नाही. तसेच, अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

नियमावली सुधारताना पालक आणि स्कूल बस चालकांच्या सूचनांचा समावेश केला जाणार आहे. “विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये,” असे सांगत सरनाईक यांनी सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

अनधिकृत वाहनांवर कारवाईसह स्कूल बसच्या सुरक्षिततेसाठी परिवहन विभाग कठोर पावले उचलणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि तणावमुक्त होण्याची अपेक्षा आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share