India Morning News
मोहोळ: सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या महापुराने मोहोळ तालुक्यातील घाटणे गावात हाहाकार माजवला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटकाळात माजी केंद्रीय मंत्री व अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी घाटणे गावात भेट देत पूरग्रस्तांना दिवाळी फराळाचे वाटप करून माणुसकीचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी केवळ मदतच वाटली नाही, तर पूरग्रस्तांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले. “सण आनंदाचा असतो, आणि तो सर्वांनी साजरा करावा, हीच खरी दिवाळी,” असे भावस्पर्शी उद्गार त्यांनी काढले.
या उपक्रमात को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियन आणि सहकार सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले. योजनाबद्ध आणि गरजूंना केंद्रस्थान देणारी ही मदत गावकऱ्यांसाठी आधार ठरली. अडसूळ यांनी पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत संवेदनशीलता दाखवली. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी, “संकटकाळात मदतीचा हात पुढे करणं हीच खरी सेवा,” असे गौरवोद्गार काढत आभार मानले.
याप्रसंगी आनंद यादव, सुनील साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. अडसूळ यांच्या सामाजिक बांधिलकीला गावकऱ्यांनी दाद दिली. त्यांनी लावलेला माणुसकीचा दीप संपूर्ण गावाला उजाळा देणारा ठरला.










