India Morning News
मुंबई :- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता या महिलांना स्वतःची महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार असून, त्याद्वारे महिलांना बचत, कर्ज व स्वयंरोजगाराच्या संधी अधिक प्रभावीपणे मिळू शकणार आहेत.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पतसंस्था स्थापन करण्यासाठी ८ मार्च २०१९ च्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक तत्वे लागू असतील. कार्यक्षेत्रानुसार सदस्यसंख्या व भांडवली मर्यादा ठरवण्यात आली आहे.
नोंदणीसाठी लागणारी अटी-
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्ये पतसंस्था स्थापन करण्यासाठी किमान २,००० सभासद आणि ३० लाख रुपयांचे भांडवल असणे आवश्यक आहे.
तालुका पातळीवर ५०० सभासद व ५ लाख भांडवली रक्कम, तर गाव पातळीवर २५० सभासद व १.५ लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
जिल्हास्तरावर १,५०० सभासद आणि १० लाख रुपयांचे भांडवल लागेल.
नोंदणी करताना महिला व बालविकास विभागाकडून पात्र महिलांची यादी प्रमाणित करून घ्यावी लागेल.
पारदर्शकतेसाठी कडक नियम-
पतसंस्था स्थापन करणाऱ्या प्रत्येक महिलेस न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यात १००% KYC, सावकारी व्यवसाय न करणे, कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये थकबाकी नसणे, व अन्य सहकारी संस्थांमध्ये संचालक नसल्याची पुष्टी असणे आवश्यक आहे. या निकषांचे पालन न झाल्यास नोंदणी नाकारली जाईल.
तसेच, प्रत्येक पतसंस्थेस एक पालक अधिकारी नेमण्यात येणार असून तो संस्थेला लेखापरीक्षण, कायदेविषयक मार्गदर्शन आणि बैठकांचे इतिवृत्त यामध्ये मदत करेल.
महिलांना होणारे फायदे-
या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळालेल्या महिलांना आता स्वतःच्या पतसंस्थेच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वाटचाल करता येईल. महिला बचत, लघुउधम, गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे अधिक आत्मविश्वासाने पाऊल टाकू शकतील.
महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय घेत राज्यात महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.










Comments are closed