India Morning News
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने शेअर केलेल्या एका वादग्रस्त चित्रावरून राज्याचे महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात असंतोषाचे वातावरण असताना काँग्रेसने केलेली ही कृती “देशविरोधी मानसिकतेचा” भाग असून, पाकिस्तानात तिचे स्वागत केले जात आहे, असा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केला.
बावनकुळे यांनी मंगळवारी एका पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पहलगाम हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आणि संपूर्ण देश हळहळला आहे. अशा संवेदनशील वेळी, ज्या वेळी देश एकवटून शोक व्यक्त करीत आहे, त्याचवेळी काँग्रेसने पंतप्रधानांविरोधात अवमानकारक चित्र प्रसारित करून दहशतवादी विचारांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले आहे.
“सर तन से जुदा” ही जी विचारसरणी पाकिस्तानातील दहशतवादी गटांनी रुजवलेली आहे, तीच मानसिकता काँग्रेसच्या या चित्रातून व्यक्त होते, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या या कृत्यामुळे देशद्रोही प्रवृत्तींना उभारी मिळत आहे, आणि दुर्दैव म्हणजे पाकिस्तानमधून याचे स्वागत होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले की, काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा फोटो शेअर केला आहे, ज्यात फक्त त्यांचा पोशाख दाखवण्यात आला असून शरीर दिसत नाही. पोस्टमध्ये असा संदेश देण्यात आला की पंतप्रधान जबाबदारीच्या क्षणी दिसेनासे होतात. या चित्राच्या माध्यमातून काँग्रेसने केवळ पंतप्रधानांचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा अपमान केला आहे.
या घटनेवर जनतेकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत असले तरी, अनेकांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले की, देशावर संकट असताना अशा प्रकारचे राजकारण अत्यंत निषेधार्ह आहे, आणि जनता काँग्रेसला हे कधीच माफ करणार नाही.






Comments are closed