India Morning News
मुंबई: मतदार यादीतील त्रुटी आणि बनावट नावांविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’नंतर आता भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी परिसरातील मतदार यादीत बनावट मतदारांची नोंद असल्याचा आरोप केला होता.
या विधानावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, “राज ठाकरे फक्त मराठी आणि हिंदू मतदारांतील डुप्लिकेट नावांबद्दल बोलतात. इतर मतदारांविषयी ते का गप्प राहतात?”
शेलार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “राज्यभरातील ३१ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल २.२६ लाख मुस्लीम डुप्लिकेट मतदार आहेत. हा ‘व्होट जिहाद’ आहे. यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मौन का बाळगतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेलार म्हणाले की, करजत-जामखेड, बीड, ठाणे यांसह अनेक भागांमध्येही मोठ्या प्रमाणात बनावट मतदार आहेत. “राज ठाकरे फक्त कल्याण आणि डोंबिवलीवरच का लक्ष केंद्रित करतात? बाकीच्या मतदारसंघांमधील गोंधळ त्यांना दिसत नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे आकडेवारी देत म्हटले की, “रोहित पवार यांच्या मतदारसंघात ५,५६२, नाना पटोले यांच्या मतदारसंघात ४७७, संदीप क्षीरसागर यांच्या क्षेत्रात १४,९४४ आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात ३०,६०१ मुस्लीम डुप्लिकेट मतदार आहेत.”
शेलार यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले — “बनावट मतदारांवर नेमकं तुमचं मत काय? मतांची ही राजकारणाची खेळी तुम्ही मान्य करता का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे.







