India Morning News
देशात डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी, बऱ्याच ग्राहकांसाठी एटीएममधून रोख पैसे काढणे अजूनही एक महत्त्वाची गरज आहे. लाखो नागरिक दररोज एटीएमचा वापर करतात. आता देशभरातील ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा बदल 1 मेपासून लागू होणार आहे – एटीएम सेवा वापरण्यासाठी आकारले जाणारे शुल्क वाढवण्यात आले आहे.
राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या शिफारसीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही नवीन नियमांना मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार, एखाद्या ग्राहकाने दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ठरवलेल्या मोफत व्यवहारांनंतर आता 17 रुपये ऐवजी 19 रुपये प्रति व्यवहार शुल्क आकारले जाईल. यासोबतच, बॅलन्स तपासण्याची फीही 7 रुपयांवरून वाढवून 9 रुपये करण्यात आली आहे.
सध्या मेट्रो शहरांमध्ये 5 आणि नॉन-मेट्रो भागात 3 मोफत व्यवहारांची मर्यादा आहे. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारले जाते. त्यामुळे, ज्यांचं बँकिंग दुसऱ्या बँकेच्या एटीएमवर अवलंबून आहे, त्यांना याचा अधिक फटका बसणार आहे.
यासोबतच, एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्यांनी इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती, कारण एटीएमची देखभाल आणि ऑपरेशन खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत. NPCI नेही ही बाब RBI समोर मांडली होती आणि आता त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.
युपीआय आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन
ATM शुल्क वाढल्याने आता अनेक ग्राहक डिजिटल पेमेंटकडे वळण्याची शक्यता आहे. जे ग्राहक UPI, मोबाईल बँकिंग किंवा नेटबँकिंगद्वारे व्यवहार करतात, त्यांना या अतिरिक्त खर्चापासून वाचता येईल. त्यामुळे, ग्राहकांनी शक्यतो आपल्याच बँकेच्या एटीएमचा वापर करावा किंवा डिजिटल व्यवहारांवर भर द्यावा, अशी शिफारस केली जात आहे.
हा बदल लागू झाल्यानंतर ग्राहकांच्या खर्चावर थोडा भार वाढेल, मात्र डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.










Comments are closed