India Morning News
मुंबई: धारावी डेपो परिसरात कर्तव्यावर असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यावर कचऱ्याचा डंपर घालण्याचा धक्कादायक प्रकार घडला. तक्रारदार अधिकारी राजू काळे यांनी प्रसंगावधान राखत बाजूला होऊन स्वतःचा जीव वाचवला, मात्र त्यांना डंपरचा जोरदार धक्का बसला. या प्रकरणात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला, तरी दखलपात्र गुन्ह्याची नोंद अदखलपात्र म्हणून करून पोलिसांनी दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, पालिका प्रशासनाकडूनही आरोपी डंपर चालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
प्रकरण काय?
दादर जी उत्तर विभागात रोगानाशक दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजू काळे यांच्यावर वांद्रे यांत्रिक गृहात वाहनचालक असलेल्या विनोद दुधखुळे याने कचऱ्याचा डंपर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी धारावी डेपो परिसरात घडली. काळे यांनी वेळीच बाजूला होत जीव वाचवला, तरी डंपरचा धक्का त्यांना बसला. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. यानंतर काळे आणि दुधखुळे यांच्यात वादावादी झाली. यावेळी दुधखुळे याने “मी युनियन लीडर आहे, जे करायचे ते कर. वरिष्ठ अधिकारी माझ्या खिशात आहेत,” असे उद्दाम वक्तव्य केल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
पार्श्वभूमी आणि वैयक्तिक वाद
काही वर्षांपूर्वी विनोद दुधखुळे हा काळे यांच्या हाताखाली काम करत होता. त्यावेळी कामचुकारपणामुळे काळे यांनी त्याच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. याच रागातून दुधखुळे याने हे कृत्य केल्याचा संशय काळे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर काळे यांनी धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच, पालिका आयुक्त भूषण गगराणी, उपायुक्त किरण दिघावकर, दादर विभागाचे सहाय्यक आयुक्त, किटक नियंत्रण अधिकारी प्रियेश शिंदे, सांताक्रुझ येथील उपनगर कार्यकारी अभियंता आणि मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे प्रकाश देवदास यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे.

पालिका आणि पोलिसांचा निष्क्रियपणा
या गंभीर प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना धारावी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून कारवाई टाळल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, पालिका प्रशासनानेही आरोपी डंपर चालकावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट, तक्रारदार राजू काळे यांच्यावरच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप आहे. आरोपी दुधखुळे युनियनच्या प्रभावाचा वापर करून गुंडगिरी करत असल्याचेही सांगितले जात आहे.
नागरिकांचा संताप
कचऱ्याच्या डंपरवर काम करणारे कर्मचारी वैयक्तिक वादातून अशा प्रकारे वर्तन करत असतील, तर ते नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अशा कर्मचाऱ्यांचा वाहनचालक परवाना रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
पालिकेची भूमिका काय?
या प्रकरणात पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, दोन्ही यंत्रणांचा निष्क्रिय दृष्टिकोन आणि तक्रारदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न यामुळे या घटनेची गंभीरता वाढत आहे. पालिकेने आरोपी कर्मचाऱ्यावर कारवाई करून अशा घटनांना आळा घालण्याची गरज आहे.











Comments are closed