India Morning News
पुणे:पुण्यातील बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या ऐतिहासिक महात्मा गांधी सभागृहाच्या (ऑडिटोरियम) पुनर्विकासाला गती देण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून राज्यातील नामवंत शासकीय संस्था असलेल्या या महाविद्यालयाचा हेरिटेज दर्जा कायम राखत सभागृहाचा कायापालट करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.सध्या महात्मा गांधी सभागृहाची आसनक्षमता केवळ ५०० आहे, तर महाविद्यालयात सुमारे १,५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
यामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राज्यस्तरीय कार्यक्रमांसाठी जागेची कमतरता भासते. यावर उपाय म्हणून सभागृहाचा पुनर्विकास करून त्याची क्षमता १,५०० आसनांपर्यंत वाढवण्याचे सूचित करण्यात आले. यासाठी एकात्मिक विकास आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
नवीन सभागृह हे महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसे आणि सुसज्ज असेल.याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १,००० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यासही बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
या निर्णयामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रम घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होणार आहे.बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र आहे. या पुनर्विकास प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होऊन संस्थेची प्रतिष्ठा आणखी उंचावेल, अशी अपेक्षा यावेळी बैठकीमध्ये व्यक्त केली.






Comments are closed