India Morning News
नागपूर :
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या ‘चक्का जाम’ आंदोलनामुळे नागपूर आणि परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
नागपूर-वर्धा, नागपूर-अमरावती, नागपूर-रायपूर आणि जबलपूर-हैदराबाद या चार प्रमुख महामार्गांवर तब्बल १५ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प राहिली. हजारो नागरिक रस्त्यावर अडकले, अनेकांना गाड्यांमध्येच रात्र काढावी लागली, तर काहींनी लेकरांसह पायी प्रवास केला. आउटर रिंग रोडवर काही किलोमीटरपर्यंत लांबच लांब ट्रॅफिक जाम दिसून आला.
अनेक महिलांनी या आंदोलनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढता, पण आम्हीही कष्टकरी आहोत, मग आमच्यावर संकट का?” असा सवाल त्यांनी केला. भक्ती देशपांडे या महिलेला त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचे होते, परंतु वर्धा महामार्गावरील आंदोलनामुळे त्या १४ तास अडकून पडल्या. अखेरीस त्यांनी लेकरांसह दोन किलोमीटर पायी प्रवास केला.
दरम्यान, ट्रक, उद्योग आणि बाजारपेठा ठप्प झाल्याने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील विस्कळीत झाला आहे. काही चालकांनी सांगितले की, “कालपासून ना जेवण मिळालं, ना पाणी.”
प्रहार संघटनेने आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे, तर प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस दल वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे, पण आंदोलनामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे आव्हानात्मक ठरत आहे.









