India Morning News
मुंबई :
महिला विश्वचषक २०२५ जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर बीसीसीआयने पैशांचा वर्षाव केला आहे.
बीसीसीआयने संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी तब्बल ५१ कोटी रुपयांच्या पुरस्काराची घोषणा केली असून, हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सन्मान ठरला आहे.
आयसीसीकडून विजेत्या संघाला मिळणाऱ्या ३९.५५ कोटी रुपयांपेक्षा १२ कोटी अधिक बक्षीस देऊन बीसीसीआयने विक्रम प्रस्थापित केला आहे. या रकमेमुळे महिला क्रिकेटला नवी दिशा मिळणार आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “१९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने क्रिकेटला नवसंजीवनी दिली होती. आता हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने महिला क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला आहे. त्यांनी केवळ विश्वचषकच नव्हे, तर देशाचं मन जिंकलं आहे.”
अंतिम सामन्यात शफाली वर्मा हिने ८७ धावांची शानदार खेळी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली, तर दीप्ती शर्मा हिने ५८ धावा आणि प्रभावी गोलंदाजी करत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब पटकावला.
महिला खेळाडूंना समान वेतनाचा निर्णय लागू केल्यानंतर बीसीसीआयने पुन्हा इतिहास रचला आहे. बक्षिसाच्या रकमेत तब्बल ३०० टक्क्यांची वाढ करून महिला क्रिकेटला नवे उंची गाठण्यास प्रेरणा दिली आहे.
२००५ आणि २०१७ च्या अपयशानंतर अखेर भारतीय महिलांनी विश्वविजयाचा मान पटकावला आहे. हा भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील पहिला विश्वविजय, तोही वनडे आणि टी२० दोन्ही फॉरमॅटमध्ये, म्हणून सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.







