India Morning News
तळेगाव दाभाडे: पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज आणि डॉ. बी.एस.टी.आर. हॉस्पिटलमध्ये भारतीय कामगार सेनेची नवी शाखा गुरुवारी स्थापन झाली. शिवसेना उपनेते व राज्यमंत्री डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले.टी.जी.एच. रिक्रेशन हॉलमध्ये आयोजित सभेत परिचारक, परिचारिका, टेक्निशियन, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. कुचिक म्हणाले, “मायमर हॉस्पिटल धर्मदाय नसून व्यापारी दृष्टिकोनातून चालते. येथील उच्चशिक्षित कर्मचारी मेहनती असूनही व्यवस्थापनाने त्यांची फसवणूक केली आहे. यापुढे कामगार सेना कर्मचाऱ्यांचे हक्क जपेल.” त्यांनी व्यवस्थापनाला इशारा देताना सांगितले, “कर्मचाऱ्यांचे हक्क नाकारल्यास शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार आंदोलन करू.”हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गौरी यांच्याशी चर्चा करून संघटनेची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली. कार्यक्रमाला शिवसेना तळेगाव शहर प्रमुख शंकर भेगडे, युनिट अध्यक्ष मीरा फड, सहसचिव संगीता घोडके, सचिव सुभाष चव्हाण, आर.पी.आय. शहराध्यक्ष संदीप शिंदे व कामगार बांधव उपस्थित होते.
प्रास्ताविक मीरा फड यांनी केले, तर आभार संगीता घोडके यांनी मानले.कुचिक यांच्या मार्गदर्शनाने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला. तळेगावातील या शाखा स्थापनेने भारतीय कामगार सेना आणि शिवसेना (उबाठा) ला नवचैतन्य मिळाले, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.









Comments are closed