India Morning News
मुंबई : राज्य भाजपमध्ये नेतृत्वबदलाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचं दिसत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा आता मंत्री रविंद्र चव्हाण घेणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. 30 जून रोजी चव्हाण आपल्या नावाची अधिकृत उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत, तर 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वरळी येथील डोममध्ये त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहेत.
देशभरात संघटनात्मक फेरबदल करत असलेल्या भाजपने महाराष्ट्रात नवे नेतृत्व आणण्याचा निर्णय घेतला असून, ही निवड आगामी राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रियेचा भाग असल्याचं समजतं. ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचार करून रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
संघटनात्मक घडामोडींना वेग; निवडणूक निरीक्षकांचीही नेमणूक
या बदलासोबतच भाजपने तीन राज्यांसाठी निवडणूक निरीक्षकांचीही घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना महाराष्ट्रासाठी, हर्ष मल्होत्रा यांना उत्तराखंडसाठी आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पश्चिम बंगालसाठी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे निरीक्षक संबंधित राज्यांत होणाऱ्या प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय प्रतिनिधींच्या निवडणुकीवर लक्ष ठेवणार आहेत.
15 जुलैपूर्वी भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा आणि तेलंगणातही लवकरच प्रदेशाध्यक्ष बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दिल्लीत आणि पंजाबमध्येही बदलाची तयारी
भाजपने राष्ट्रीय नेतृत्व ठरवल्यानंतर दिल्ली आणि पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्येही लवकरच नवे अध्यक्ष नियुक्त करण्याची योजना आखली आहे. तसेच, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये 4 ते 11 जुलैदरम्यान नवीन नेतृत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाआधी संघटनात्मक घडामोडींची प्रक्रिया पूर्ण करण्याचा भाजपचा निर्धार आहे, जेणेकरून पक्ष अंतर्गत स्थैर्य निर्माण करता येईल आणि आगामी राजकीय आव्हानांना अधिक ताकदीनं सामोरे जाता येईल.










Comments are closed