Shopping cart

  • Home
  • News
  • भाजपचा 2034 मध्ये नवीन संविधान लागू करण्याचा कट; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा गंभीर आरोप

भाजपचा 2034 मध्ये नवीन संविधान लागू करण्याचा कट; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा गंभीर आरोप

April 15, 20251 Mins Read
66

India Morning News

Share News:
Share

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खळबळजनक दावा करत म्हटले आहे की, भाजप 2034 मध्ये देशात नवीन संविधान लागू करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. सध्या या प्रक्रियेच्या अनुषंगाने संघ आणि भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार शब्दबाण सोडले. मोदींना भारताचे विद्यमान संविधान न मान्य असून, त्यांनी मनुस्मृतीवर आधारित विचारधारा स्वीकारल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

भ्रम निर्माण करून जनतेची दिशाभूल –

गेल्या 11 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या काळात उल्लेखनीय काहीच न केल्यामुळेच मोदी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पुढे करत आहेत, असे सपकाळ म्हणाले. भ्रम निर्माण करणे आणि काँग्रेसवर अपप्रचार करणे हेच भाजपचे प्रमुख धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले. नेहरूंनी डॉ. आंबेडकरांना कायदा मंत्रीपद देऊन दिलेला सन्मान मोदी विसरत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या भाजपवर टीकास्त्र-

सपकाळ यांनी भाजप व संघ परिवारावर डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यांनी कालाराम मंदिरातील ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख करत, भाजपने बाबासाहेबांना कधीच संमती दिली नसल्याचे म्हटले. मनुस्मृतीच्या आधारे राज्यकारभार चालवण्याचा संघाचा विचार असलेल्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाचे त्यांनी उदाहरण दिले आणि भाजपला खुले आव्हान दिले की त्यांनी या पुस्तकाची होळी करावी.

नव्या संविधानासाठी सुरू असलेल्या हालचालींवर प्रकाशझोत-

2034 मध्ये नवे संविधान लागू करण्याच्या दृष्टीने बैठकांची मालिका सुरू असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की भाजपची “400 पार” मोहिम हेच दर्शवते की त्यांचा उद्देश संविधानात मूलभूत बदल करणे हाच आहे. “मुह मे राम, बगल मे छुरी” अशा दुटप्पी भूमिकेपेक्षा भाजपने संविधान बदलण्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

शहा आणि फडणवीसांवर ऐतिहासिक दृष्टिकोनातून टीका-

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सपकाळ यांनी जोरदार टीका केली. औरंगजेबप्रमाणे धर्माचा वापर राजकारणासाठी करण्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ब्रिटिश कालखंडातील माफी मागणाऱ्या प्रवृत्तींचा उल्लेख करत, त्यांचे स्मारक काढून टाकण्याचा प्रश्न उपस्थित केला. “फुले” चित्रपटावर बंदी का घालायची? असा सवाल उपस्थित करत त्यांनी ऐतिहासिक सत्य लपवण्याचा आरोप केला.

दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. भाजप नवीन संविधान आणणार असल्याच्या दाव्यामुळे आगामी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share