India Morning News
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील नोकुंडी भागात रविवारी मध्यरात्री झालेल्या आत्मघातकी स्फोटांनी दहशत माजली. फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयाजवळ परदेशी तज्ञ आणि अभियंत्यांसाठी उभारलेल्या विशेष निवास प्रकल्पावर हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला बलुच लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) या बंडखोर संघटनेने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सलग पाच जोरदार स्फोट घडवून आणले आणि त्यानंतर सुरक्षा दलांवर अंधाधुंद गोळीबार केला. स्फोटांमुळे परिसरात भीती आणि गोंधळ निर्माण झाला. बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वाहरम बलोच यांनी अधिकृत निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
हल्ला ज्या वसाहतीत झाला, त्या ठिकाणी पाकिस्तान सरकारने खाण प्रकल्पांवर काम करणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. या प्रकल्पांमुळे मोठ्या परदेशी गुंतवणुकीची अपेक्षा होती. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. मृत किंवा जखमींचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर केलेला नाही; मात्र चगाई जिल्ह्यातील रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रिको डिक आणि सैंदक या दोन महत्त्वाच्या खाण प्रकल्पांसाठी पाकिस्तान सक्रियपणे गुंतवणूक आकर्षित करत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील EXIM बँकेने रिको डिक प्रकल्पासाठी आर्थिक मदत मंजूर केली होती. मात्र, आता झालेल्या हल्ल्यामुळे प्रकल्पांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाकिस्तानने अनेक वर्षे विविध दहशतवादी संघटनांना पाठबळ दिल्याचा आरोप आधीपासूनच आहे. आता त्याच संघटनांकडून सलग हल्ले होत असल्याने देशातील सुरक्षा आणि दहशतवादविरोधी यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


