Shopping cart

  • Home
  • News
  • बोगस शिक्षक भरती;परभणीत शिक्षकाच्या आत्महत्येने खळबळ

बोगस शिक्षक भरती;परभणीत शिक्षकाच्या आत्महत्येने खळबळ

April 17, 20251 Mins Read
166

India Morning News

Share News:
Share

चिठ्ठीत संस्थाचालकावर गंभीर आरोप

संपूर्ण राज्यात बोगस शिक्षक भरती प्रकरण गाजत असतानाच परभणीत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नरसिंह प्राथमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या 35 वर्षीय शिक्षकाने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिक्षक सोपान शिवराम पालवे यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले असून, त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत संस्थेच्या सचिवावर आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत.

पालवे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांनी शिक्षक पदावर नेमणुकीसाठी त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान वाढवण्यासाठी आणखी 5 लाखांची मागणी केली गेली. एवढे पैसे दिल्यानंतरही त्यांना नियमित पगार मिळाला नाही. काहीवेळा फक्त 20% वेतन दिले गेले, तर काहीवेळा तेही नाही. या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

ही घटना परभणी तालुक्यातील आरपी रुग्णालयाजवळ घडली. पालवे हे मूळचे सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील रहिवासी होते. त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालवे यांच्या आत्महत्येप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालवे कुटुंबीयांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण आणि सचिव बळवंत खळीकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो यशस्वी झाला नाही.

नागपुरात बोगस शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा उघडकीस –

या पार्श्वभूमीवर नागपुरातूनही एक मोठा घोटाळा समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील अनेक खासगी शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची बनावट पद्धतीने भरती करण्यात आल्याचा प्रकार शिक्षण विभागाच्या अहवालातून उघड झाला आहे. या बनावट नियुक्त्यांमुळे शासकीय निधीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

या दोन्ही घटना शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि शिक्षक भरती प्रक्रियेमधील पारदर्शकतेचा अभाव अधोरेखित करतात.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share