India Morning News
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महाल हॉटेल उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मुंबईतील विमानतळ पोलिसांना प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांच्यावरील मृत्युदंडाचा सूड घेण्याची दहशतवाद्यांनी चेतावणी दिली आहे.
या ईमेलची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ लक्ष घालून तपास सुरू केला असून, दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
धमकीचा मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एअरपोर्ट पोलिसांच्या अधिकृत मेलवर पाठवण्यात आला. मेल वाचल्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायाने वरिष्ठ निरीक्षक व्हटकर यांना तातडीने माहिती दिली. मेलमध्ये असा उल्लेख आहे की, विमानतळ आणि ताज परिसरात एकूण सात आरडीएक्स बॉम्ब लपवण्यात आले आहेत.
त्याआधारे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने टर्मिनल १ व २, मुख्य प्रवेशद्वार, टॅक्सी स्थानक, ताज सांताक्रूझ हॉटेल आणि एटीसी टॉवरचा सखोल तपास केला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आज सकाळी विमानतळावरून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. पुण्यातील ISIS स्लीपर सेलशी संबंधित अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा खान ही दोघं इंडोनेशियातून भारतात दाखल झाल्यानंतर टर्मिनल २ वर सापळा रचून अटक करण्यात आली.
दोघांचं सामान ताब्यात घेऊन तपासण्यात आलं असून, हे आरोपी गेल्या दोन वर्षांपासून फरार होते. या दोघांवर तीन लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू असून, पाकिस्तानातील अड्ड्यांवरही हल्ले करण्यात आले आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर धमकीचा ईमेल आल्याचं मानलं जात आहे.सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून, पोलीस यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






Comments are closed