India Morning News
नागपूर: नागपूरच्या उच्च सुरक्षा असलेल्या सेमिनरी हिल परिसरातील CGO कॉम्प्लेक्सला बॉम्बस्फोट करण्याची धमकी निनावी ई-मेलद्वारे मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी ही माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली. सुदैवाने, प्राथमिक तपासात कोणताही स्फोटक पदार्थ आढळलेला नाही.
ही धमकी CGO कॉम्प्लेक्सच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या स्फोटक व सुरक्षा विभागाला सकाळच्या सुमारास प्राप्त झालेली असून, ई-मेलमध्ये स्पष्टपणे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तांत्रिक पथकांसह तपास सुरू केला.
CGO कॉम्प्लेक्समध्ये CBI, CPWD, केंद्रीय जल आयोग, प्रादेशिक पोस्ट कार्यालय यांसारख्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या शासकीय संस्था कार्यरत आहेत. या इमारतीत दररोज शेकडो अधिकारी-कर्मचारी कार्यरत असतात, त्यामुळे अशा प्रकारची धमकी ही केवळ विनोद नसून राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर मानली जात आहे.
सध्या ई-मेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर सेल आणि गुप्तचर विभाग सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात केली असून, कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगली जात आहे. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,धमकीचा तपास प्राधान्याने सुरू आहे. कोणीही घाबरून न जाता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.”










Comments are closed