India Morning News
पुणे: फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संचालक मंडळावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करावी, अन्यथा ठेवीदार व कर्जदारांसह सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला.
चरेगावकर यांनी बोगस कंपन्यांमार्फत कराड येथील अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ऑडिट अहवालात गैरव्यवहार उघड झाले असून, बोगस कर्जे, खोटे जामीनदार आणि बँकेच्या पैशांचा गैरवापर करून चरेगावकर यांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या फायद्यासाठी मालमत्ता खरेदी केल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. “१२७ कोटींची कर्जे चरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी कडक कारवाई आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
सहकार खात्याचा निष्क्रियपणा
कुलकर्णी यांनी सहकार खात्याच्या निष्क्रियपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बँकेतील २३० कोटींच्या ठेवी अडचणीत असून, तीन अहवालांनंतरही सहकार खात्याने कारवाई केलेली नाही. “चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल यांच्याकडून पीडितांना आणि मलाही धमक्या मिळत आहेत. सहकार खात्यावरील दबाव आणि पोलिसांचा निष्क्रियपणा संशयास्पद आहे,” असे त्या म्हणाल्या. याप्रकरणी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना भेटणार असून, केंद्रीय सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
ठेवीदारांचे हाल
बँकेतील गैरव्यवहारांमुळे ठेवीदारांचे पैसे अडकले असून, अनेकांनी दबावामुळे आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुलकर्णी यांनी केला. “संचालक मंडळ ठेवीदारांवर दबाव टाकत आहे. बँक बुडाल्याचे दाखवून ठेवीदारांना केवळ पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले जात आहे. हे ग्राहक आणि सरकारची फसवणूक आहे,” असे त्यांनी सांगितले. बँकेवर प्रशासक नेमावा आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची मागणी आहे.
आंदोलनाचा इशारा:
सहकार आयुक्तांना कारवाईसाठी पत्र देऊनही प्रतिसाद न मिळाल्यास ठेवीदार व कर्जदारांसह सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला. यावेळी पीडित ठेवीदार, कर्जदार,ॲड.निलेश जाधव, गणेश पवार, एस. डी. कुलकर्णी उपस्थित होते.










Comments are closed