India Morning News
पुणे : लोहगाव येथील पालावर राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सनी फुलमाळी याने नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करताना भाजपा नेते तथा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सनीची आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन अभिनंदन केले. लोहगाव येथील कुस्ती आखाड्यात झालेल्या या कार्यक्रमात चंद्रकांत दादांनी सनीचे पालकत्व स्वीकारले असून, लोकसहभागातून घर बांधणे, सरावासाठी तालीम उभारणे, शिक्षणासाठी मदत तसेच स्वतःच्या पगारातून दरमहा ५०,००० रुपये देण्याची घोषणा केली.
सनीने शिक्षणासोबतच कुस्तीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून पुढे ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकावे, अशी शुभेच्छा चंद्रकांत दादांनी व्यक्त केली. “सनीसारख्या होतकरू खेळाडूंना आधार दिल्यास महाराष्ट्राला अधिक पदके मिळतील,” असे मत त्यांनी मांडले. सनीच्या यशामुळे पालावरील मुले-मुलींमध्ये खेळाची प्रेरणा निर्माण झाली असून, स्थानिकांनी या मदतीचे स्वागत केले.

या प्रसंगी सनीचे प्रशिक्षक उस्ताद सदाशिव राखपसरे यांनी सनीच्या मेहनतीचे कौतुक करताना सांगितले की, “पालावरील मातीतील हा मुलगा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकतोय. चंद्रकांत दादांची मदत त्याला पंख देईल.” भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॅाबी टिंगरे तसेच भागातील नागरिक आणि पालावरील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सनीला शुभेच्छापत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सनी फुलमाळी हा लोहगावच्या कुस्ती आखाड्यातून घडलेला अव्वल पैलवान असून, त्याच्या यशाने पुण्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाची लाट उसळली आहे.










