India Morning News
मुंबई:-
महाराष्ट्रातील निर्धन व दुर्बल घटकांसाठी धर्मादाय खासगी रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांवर आज विधान भवन, मुंबई येथे “धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी समिती”च्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत की नाही, यावर समिती लक्ष ठेवते. बैठकीत योजनांमधील तरतुदी आणि अंमलबजावणीवर विचारविनिमय करण्यात आला.
धर्मादाय रुग्णालय योजना:-
1.खाटा आरक्षण: प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात एकूण खाटांपैकी २०% खाटा राखीव ठेवणे बंधनकारक. यात १०% खाटा निर्धन आणि १०% दुर्बल घटकांसाठी.

2. उपचार खर्च:
-निर्धन रुग्ण: वार्षिक उत्पन्न ₹१.८० लाखांपेक्षा कमी असलेल्यांना मोफत उपचार.
– दुर्बल घटक: वार्षिक उत्पन्न ₹३.६० लाखांपेक्षा कमी असलेल्यांना सवलतीच्या दरात उपचार.
3. निर्धन रुग्ण निधी (IPF): रुग्णालयांनी एकूण बिलिंगच्या २% रक्कम या निधीत जमा करावी. हा निधी निर्धन व दुर्बल रुग्णांच्या उपचारांसाठी वापरला जातो.
4. तत्काळ उपचार: आपत्कालीन परिस्थितीत अनामत रक्कम न घेता रुग्णांना तात्काळ दाखल करून उपचार सुरू करणे बंधनकारक.
5. आरोग्य विमा योजना: सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ (MJPJAY) आणि ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (PMJAY) अंतर्गत नोंदणी करावी. या योजनांद्वारे रुग्णांना ₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार.
आवश्यक कागदपत्रे
– पिवळे/केशरी रेशनकार्ड
– तहसीलदारांचा वार्षिक उत्पन्न दाखला
– BPL कार्ड (उपलब्ध असल्यास)
मदतीसाठी संपर्क
टोल-फ्री क्रमांक: १८००२२२२७०
वेबसाइट: charity.maharashtra.gov.in
या योजनांचा लाभ घेण्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईकांनी रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवकांशी संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अडचण आल्यास वरील टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.







Comments are closed