Shopping cart

  • Home
  • News
  • शहरात दोन नव्या रोड स्विपिंग मशीनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

शहरात दोन नव्या रोड स्विपिंग मशीनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

May 18, 20251 Mins Read
129

India Morning News

Share News:
Share

नागपूर, ता. १७ ः शहरातील रस्त्यांची साफसफाई तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी नागपूर महापालिकेने आणखी दोन नव्या रोड मेकानाईज्ड स्विपिंग मशीन खरेदी केल्या आहेत. या दोन्ही मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता. १७) भांडेवाडी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रात झाले.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वच्छता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्रीमती सोनम देशमुख उपस्थित होते.
नागपूर शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे चार पदरी रस्त्यांचे व उड्डाणपुलांचे जाळे देखील वाढत आहेत. ज्यामुळे शहरतील वायू प्रदुषणामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने रस्ते स्वच्छ करण्याकरीता यांत्रिकी पध्दतीचा वापर करुन मुख्य रस्ते व उड्डाणपुलांची साफ-सफाई करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानांचा वापर करणे काळाची गरज असल्यामुळे नागपूर महानगरपालिका निधीतून या नव्या 2 मेकानाईज्ड रोड स्विपिंग मशीन खरेदी केल्या आहेत.


सन 2022 मध्ये राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) प्राप्त निधीतून 2 मशीन खरेदी करण्यात आलेल्या होत्या. सन 2024 मध्ये 15 व्या वित्त आयोगातील अनुदानातून यापूर्वी मशीन खरेदी केल्या आहे. ज्या सध्या शहरातील चार पदरी रस्ते व उड्डाणपुलांची सफाई करण्याकरीता वापरण्यात येत आहे. आता नागपूर महापालिकेच्या सेवेत ९ रोड स्विपिंग मशीन आहेत. तसेच नागपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचे मार्फत 6 रोड स्विपिंग मशीनची
मागणी सुध्दा केलेली आहे.
महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या या दोन नवीन मशीन वैशिष्ट्यपूर्ण असून सदर मशीनमध्ये पाण्याचा फवारा असल्याने रस्ता स्वच्छता दरम्यान धुळीचे कण हवेत उडणार नसल्याने हवेतील प्रदुषण कमी होईल. शहरातील कमी रुंदीच्या उड्डाणपुलांची सफाई मनुष्यबळांमार्फत करतांना होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. या मशीनमध्ये देण्यात आलेल्या सक्शन होज पाईपच्या मदतीने रस्ते सफाई करताना रस्त्यालगत जमा करण्यात आलेल्या कचऱ्यांचे ढिगारे तसेच नागरीकांमार्फत टाकण्यात येणारा कचऱा मनुष्यबळाचा वापर न करता मशीनद्वारे सहजरीत्या उचलणे शक्य होणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share