Shopping cart

  • Home
  • News
  • नागपुरात चिमुकलीचे अपहरण; पोलिसांकडून चिमुकलीची सुखरूप सुटका,आरोपीला अटक

नागपुरात चिमुकलीचे अपहरण; पोलिसांकडून चिमुकलीची सुखरूप सुटका,आरोपीला अटक

May 5, 20251 Mins Read
55

India Morning News

Share News:
Share

नागपूर : शहरात एका माथेफिरू गुन्हेगाराने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्या आईकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. आरोपीने २० हजार रुपयांची मागणी करत धमकी दिली होती की, पोलिसांकडे गेल्यास मुलीचा जीव घेईल. मात्र, बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या ४५ मिनिटांत ती मुलगी सुखरूप शोधून काढली आणि आरोपीला अटक केली.

व्यसनासाठी पैसे हवे होते, घेतलं टोकाचं पाऊल-
मुलीच्या अपहरणाचा आरोप सूर्या ऊर्फ मिलिंद बघेल (वय २९, राहणार बुटीबोरी) या व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे. बघेलवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पीडित मुलीची आई त्याच्या परिचयाची असल्याने तिचा विश्वास घेत त्याने हे धाडस केलं. व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या बघेलने पैशासाठी हा कट रचल्याचे उघड झाले आहे.

रस्त्यावरून मुलीला जबरदस्तीने नेलं, फोन करून दिली धमकी-
महिला आपल्या दोन मुलांसह वर्धा मार्गावरील तृप्ती हॉटेलजवळ बसची वाट पाहत असताना आरोपीने अचानक येऊन मुलीला उचललं आणि घटनास्थळावरून पळून गेला. काही वेळातच त्याने महिलेला फोन करून २० हजार रुपये मागितले. त्याच वेळी पोलिसांकडे गेल्यास मुलीचा गळा कापण्याची धमकीही दिली.

पोलिसांचा स्मार्ट डाव आणि ठिकाणाचा शोध
घाबरलेल्या महिलेने तातडीने बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तीन पथकं तयार करण्यात आली. आरोपी धोकादायक असल्यामुळे पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये तपास सुरू ठेवला. एका पोलिसाने आपला नातेवाईक असल्याचे सांगून आरोपीशी संपर्क साधला आणि पैसे देण्याचा बहाणा केला.

मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीचा ठाव घेतला. तो बुटीबोरी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांनी त्या भागात शोधमोहीम तीव्र केली.

शिस्तबद्ध कारवाईत अपहरणकर्त्याला पकडलं-
शोधमोहिमेदरम्यान सर्व्हिस रोडवर एक व्यक्ती निळ्या फ्रॉकमधील मुलीसह चालताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, सुरुवातीला त्याने खोटं नाव सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कडक पवित्रा घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुलीची सुखरूप सुटका करत तिला आईच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी बघेलला ताब्यात घेऊन त्याच्यावर अपहरण, खंडणी आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा धोका
नागपूर पोलिसांनी वेळेवर आणि संयमाने पावलं उचलल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर कोणतीही चूक झाली असती, तर मुलीचा जीव धोक्यात आला असता. ही कारवाई पोलिसांच्या तत्परतेचे आणि धोरणात्मक कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share