India Morning News
Sub heading- पोलिसांच्या मदतीने पथकाची धडक कारवाई
कामठी :- जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात बालविवाहाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच कामठी परिसरात एक अल्पवयीन मुलीचा विवाह थोडक्यात रोखण्यात आला. पोलिस आणि जिल्हा बाल संरक्षण पथकाने तातडीने हस्तक्षेप करून विवाहाच्या तयारीदरम्यानच ही कारवाई केली.
सदर प्रकरणात १७ वर्षीय मुलीचा विवाह पार पडण्याच्या तयारीत होता. नवरी हळद लावून सज्ज होती, पण कामठी नवीन पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश आंधळे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्वरीत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याशी संपर्क साधला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रंजीत कुरे यांच्या आदेशानुसार तातडीने एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आणि पोलिसांच्या मदतीने ते कामठीला रवाना करण्यात आले. अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश मिळवण्यात आले असून, संबंधित पालकांना कायदेशीर इशारा देत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करून तिला सुरक्षित बालगृहात ठेवण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कामठी परिसरात बालविवाहाच्या तक्रारी वाढत असून, या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मंगल कार्यालय, हॉल, डेकोरेशन, केटरिंग आणि विवाह लावणाऱ्या मंडळींना नोटीस बजावण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांची वयोमर्यादा निश्चित झाल्याशिवाय सेवा देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले जाणार आहेत.
बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी महिला व बालविकास विभाग आणि पोलिस विभाग एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत. या कारवाईमध्ये संरक्षण अधिकारी साधना हटवार, दीप्ती मोडघरे, रुक्मिणी जंगलवार आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैष्णवी बावणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.बालविवाह रोखणे ही केवळ सरकारी जबाबदारी नसून समाजाचीही नैतिक जबाबदारी आहे.






Comments are closed