India Morning News
नागपूर:काँग्रेस पक्षाने तुषार गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथून सुरू केलेल्या ‘संविधान सत्याग्रह पदयात्रे’वर भाजप आमदार अमित गोरखे यांनी जोरदार टीका केली आहे. या यात्रेला ‘काँग्रेसची नौटंकी’ आणि ‘ढोंगीपणा’ संबोधत त्यांनी काँग्रेसच्या संविधानविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आ. गोरखे म्हणाले, “ज्या काँग्रेसने आपल्या कार्यकाळात संविधानाचा अपमान केला, आणीबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावले, राजीव गांधींच्या काळात शहाबानो प्रकरणात न्यायालयाचा निर्णय फिरवला, तोच पक्ष आज संविधान वाचवण्याचे नाटक करत आहे. एका कुटुंबाच्या फायद्यासाठी संविधान आणि लोकशाही कमकुवत करणाऱ्या काँग्रेसला सत्याग्रहाचा नैतिक अधिकार नाही.”

त्यांनी काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा गंभीर आरोप केला. “काँग्रेसने बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. नेहरूंनी आरक्षणाला विरोध करण्याचे निर्देश दिले, बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत केले.
काँग्रेसच्या काळात त्यांना भारतरत्न नाकारले गेले; हा सन्मान व्ही. पी. सिंह आणि भाजप सरकारने दिला. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याची इच्छाही काँग्रेसला नव्हती. मोदी सरकारने लंडनमधील त्यांचे घर विकत घेऊन स्मारक उभारले,” असे गोरखे म्हणाले.
भाजपने ‘एक देश, एक संविधान’चा नारा देत कलम ३७० रद्द करून संविधानाला बळकटी दिल्याचा दावाही त्यांनी केला. “काँग्रेसचा खरा चेहरा हा ढोंगीपणाचा आहे,” असे सांगत गोरखे यांनी काँग्रेसच्या सत्याग्रहाला खोटे ठरवले.









Comments are closed