Shopping cart

  • Home
  • News
  • नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावर काँग्रेसचा राष्ट्रव्यापी प्रतिउत्तर मोहिमेला प्रारंभ; ५७ शहरांमध्ये पत्रकार परिषदा

नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावर काँग्रेसचा राष्ट्रव्यापी प्रतिउत्तर मोहिमेला प्रारंभ; ५७ शहरांमध्ये पत्रकार परिषदा

April 21, 20251 Mins Read
54

India Morning News

Share News:
Share

नवी दिल्ली – ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने देशव्यापी पत्रकार परिषदांच्या मालिकेची घोषणा केली आहे. २१ एप्रिलपासून सुरू झालेली ही मोहीम २७ एप्रिलपर्यंत चालणार असून, देशभरातील ५७ प्रमुख शहरांमध्ये काँग्रेसने ५७ पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे.

या मोहिमेला ‘काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ असे शीर्षक देण्यात आले असून, भाजपने रचलेल्या कथित खोट्या आरोपांचा पर्दाफाश करण्याचा काँग्रेसचा उद्देश आहे, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. रविवारी ‘एक्स’वरून माहिती देताना काँग्रेसच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी सांगितले की, विजयवाडा पासून वाराणसीपर्यंत, काश्मीर ते केरळ, काँग्रेस नेते देशभर फिरून भाजपच्या खोट्या प्रचारावर प्रहार करतील.

पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेणाऱ्या नेत्यांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये मणिकम टागोर, पी. चिदंबरम, सुप्रिया श्रीनेट, शशी थरूर, भूपेश बघेल, अशोक गेहलोत, कन्हैया कुमार, अलका लांबा यांसारख्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत १९ एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घोषित केला. त्यावेळी बोलताना त्यांनी आरोप केला की, सोनिया गांधी व राहुल गांधी यांची नावे केवळ सूडबुद्धीने आणि राजकीय हेतूने आरोपपत्रात घातली गेली आहेत. “आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरणार नाही,” असेही ते म्हणाले.

खरगे यांनी याआधीही मोदी सरकारवर टीका करताना, ईडी आणि सीबीआयचा वापर करून काँग्रेसच्या अधिवेशनात अडथळे आणल्याचा आरोप केला होता.

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?
भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये दाखल केलेल्या खटल्यात आरोप केला की, काँग्रेसने “यंग इंडियन लिमिटेड” नावाच्या संस्थेच्या माध्यमातून “नॅशनल हेराल्ड” प्रकाशित करणारी “असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड” (AJL) बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतली. या व्यवहारात २००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर केवळ ५० लाख रुपयांत नियंत्रण मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्वामी यांनी या प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

या संपूर्ण घडामोडींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरत असून, भाजपच्या कथित राजकीय सूडबुद्धीचा पर्दाफाश करण्याचा निर्धार केला आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share