India Morning News
मुंबई:राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये इन-आऊटचे सत्र सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी वाईट बातम्यांची मालिका थांबताना दिसत नाही. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता भोर मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. या धक्क्यातून काँग्रेस सावरते न सावरते तोच युवक काँग्रेसमधील एक महत्वाचा चेहरा रोहन सुरवसे पाटील यांनीही आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
रोहन सुरवसे पाटील हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवला आहे. सपकाळ यांनी यापूर्वी थोपटे यांच्या संदर्भात आश्वासक विधानं केली होती. आता सुरवसे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे.
गटबाजी व अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा-
आपल्या राजीनाम्याच्या पत्रात रोहन सुरवसे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काँग्रेससाठी काम केले. मात्र पक्षातील गटबाजी आणि अंतर्गत चढाओढीमुळे आता काम करणं कठीण झालं आहे. “जनतेच्या आणि विशेषतः युवकांच्या प्रश्नांसाठी मी रस्त्यावर उतरलो, आंदोलनं केली. पण आज पक्ष अडचणीत असताना निष्ठावान कार्यकर्त्याला राजीनामा द्यावा लागतो, हे दु:खद आहे,” असे त्यांनी नमूद केले.
संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर-
माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ईमेलद्वारे पाठवला असून लवकरच भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. थोपटे यांनी भोर-वल्हे-मुळशी या भागात तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसपासून अंतर घेतलं होतं. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून त्यांची भाजपशी जवळीक झाली आणि त्यातूनच भाजपमध्ये प्रवेशाची दिशा ठरली.










Comments are closed