India Morning News
नागपूर: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली की काँग्रेस मुंबईसह राज्यभरातील स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवणार आहे.
मुंबईतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी एकमताने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केलं की, मनसेसोबत कोणत्याही प्रकारच्या आघाडीचा विचार सध्या नाही.
“आमचे मुंबईतील नेते ठाम आहेत – काँग्रेस स्वबळावरच लढेल,” असे त्यांनी ठामपणे म्हटलं.
वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. “भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट वगळता, स्थानिक नेते इतर कोणत्याही पक्षाशी आघाडीचा विचार करू शकतात — परंतु त्यासाठी आमची औपचारिक मंजुरी आवश्यक असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हा निर्णय काँग्रेसने पक्षाच्या आलाकमानाशी चर्चा करूनच घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रस्ताव आला, तर त्यावर विचार केला जाईल,” असे वडेट्टीवार म्हणाले.
मुंबईतील काँग्रेस संघटनांना बळकटी देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.





