India Morning News
बेळगाव : गणेशोत्सवाची धामधूम संपताच बेळगावात मराठी भाषिकांची नाराजी उफाळून आली आहे. शहरातील मराठी भाषेतील शुभेच्छा फलक हटविण्याची मोहीम महापालिकेने बुधवारी (१० सप्टेंबर) पहाटे तीन वाजेपर्यंत राबविली. विशेष म्हणजे, हे फलक हटविण्याची मागणी एका कन्नड संघटनेने केली होती. आंदोलनाची धमकी मिळाल्यानंतर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी महसूल विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.
महसूल आयुक्त अनिल बोरगावी, महसूल निरीक्षक संतोष ओसी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शहरभर ही मोहीम हाती घेतली. गणेशोत्सव काळात दोन आठवड्यांपूर्वीपासून मराठी शुभेच्छा फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. त्यातील अनेक फलक राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा संदेशांसह दिसत होते. मात्र, कन्नड संघटनांना हे फलक खटकले.
याआधीही शनी मंदिराजवळील मराठी फलकावर आक्षेप घेऊन कन्नड संघटनांनी तक्रार केली होती. त्यानंतर तो फलक महापालिकेकडून हटविण्यात आला होता. मात्र, विरोध वाढल्याने पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तो पुन्हा उभारण्यात आला. तरीदेखील, गणेशोत्सव संपल्यानंतर मराठी फलक हटविण्याची मागणी नव्याने पुढे आली.
मराठी भाषिकांनी या कारवाईला जोरदार विरोध दर्शवला असून धार्मिक सणात महापालिका भाषाभेद करत असल्याचा आरोप केला आहे. गणेशोत्सव हा मराठमोळा सण असून त्यातही मराठी फलकांवर कारवाई केल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी महापौर मंगेश पवार यांची भेट घेऊन मराठी फलकांवर बंदीची मागणी केली होती. त्यानंतरच्या घडामोडींवरून महापालिका कन्नड संघटनांच्या दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक नागरिकांची भावना – “गणेशोत्सवासारख्या सणातही भाषाभेद घडवून आणला जात आहे. कन्नड संघटनांचा दबाव आणि महापालिकेची भूमिका ही मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.










Comments are closed