Shopping cart

  • Home
  • News
  • राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक; एका दिवसात आढळले ८६ रुग्ण, चौघांचा मृत्यू

राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक; एका दिवसात आढळले ८६ रुग्ण, चौघांचा मृत्यू

June 4, 20251 Mins Read
232

India Morning News

Share News:
Share

नागपूर :-
राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे ८६ नवीन रुग्ण आढळले असून, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही वाढती आकडेवारी प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंता निर्माण करणारी आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या आरोग्य अहवालानुसार, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब अशी की, याच कालावधीत ४३५ रुग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतण्याचं समाधान मिळवलं आहे. तरीसुद्धा, सध्या राज्यात एकूण ५९० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर नाशिकमधूनही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सध्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

नागपुरात दोन रुग्णांचा मृत्यू –

दरम्यान, नागपूरमध्ये कोरोना संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, या दोघांना इतर गंभीर आजारही होते. एक रुग्ण HIV आणि क्षयरोगाने ग्रस्त होता, तर दुसऱ्याला मूत्रपिंडाशी संबंधित समस्या होती. नागपुरात आतापर्यंत १७ रुग्ण आढळले असून त्यातील ११ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत असून सध्या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सात आणि शहरात वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनाचा विषाणू पुन्हा वेगाने पसरत असल्याने, राज्यभरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईतील कामा रुग्णालयाने विशेष खबरदारी घेत ३० खाटांचा कोरोना युनिट उभारला आहे. हे रुग्णालय मुख्यतः महिला व बालकांसाठी कार्यरत असून, सुसज्ज रुग्णकक्षामध्ये प्राणवायू, निगराणी यंत्रणा आणि इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सध्या देशभरात ४ हजार २६ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रात ही संख्या ५१० वर पोहोचली आहे. वाढती आकडेवारी पाहता सरकारकडून पुन्हा एकदा नागरिकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share