India Morning News
पुणे: शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंड आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या समितीत सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करताना त्यांनी अधिकाऱ्यांसह सदस्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे, या भ्रष्टाचाराला सरकारचा वरदहस्त असल्याचा आरोप करून रोहित पवार यांनी सरकारने याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. याबाबत कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर ट्विट करून या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली असून, अधिकाऱ्यांसह सदस्यांच्या संगनमताने इथे सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तात्काळ कारवाई व्हावी, अन्यथा शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार.” या ट्विटमधून त्यांनी प्रकरणाची गांभीर्य अधोरेखित केले आहे.
या प्रकरणावर सविस्तर पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी माहिती दिली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते. लवांडे हे गेल्या अनेक दिवसांपासून या भ्रष्टाचारावर आवाज उठवत आहेत.
पुणे शहरातील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी समितीतील विविध गैरव्यवहारांचे वर्णन केले. यामध्ये जी-५६ गैरव्यवहारात बेकायदा भाडे वसुली, ४ हजार लोकांना अनधिकृत परवाने देणे, बाजार समितीच्या जागा अनधिकृतपणे भाड्याने देणे, रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत भ्रष्टाचार, गाळ्यांचे अनधिकृत वाटप, शेतकऱ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे बंद करून त्या जागा सलून किंवा गुटखा विक्रीसाठी देणे, संचालकांकडून पार्किंगच्या नावाखाली लूटमार, सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार, गुंडांचा सर्रास वापर यामुळे व्यापाऱ्यांना होणारा त्रास आणि स्वच्छता कंत्राटातील गैरव्यवहार यांचा समावेश आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी जगताप यांची नेमणूक करण्यात आली असली तरी तेही गैरव्यवहारात अडकले असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही पणन संचालकांकडून पारदर्शक चौकशी होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
कळस म्हणजे, गैरव्यवहारावर पांघरून घालण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांपर्यंत हप्ते वसुली होत असल्याच्या चर्चा आहेत. “पुढील १५ दिवसांत सरकारने कारवाई केली नाही तर शेतकऱ्यांसोबत मोठे आंदोलन केले जाईल, याची नोंद घ्या,” असे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले.
हे प्रकरण राजकीय वातावरणात तापमान वाढवण्याची शक्यता आहे, सरकारने या आरोपांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी, अन्यथा पुढील टप्प्यातील आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.











Comments are closed