India Morning News
नागपूर : शहरातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मध्यरात्री नंदनवन परिसरात मोठी कारवाई करत एका आरोपीला अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूसासह पकडण्यात यश मिळवलं आहे. या कारवाईनंतर नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 12.10 ते पहाटे 1.55 या वेळेत नंदनवन हद्दीतील जे.एल. चतुर्वेदी कॉलेजच्या मागील भागात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी चैतन्य उर्फ चिंटू रामकृष्ण डांगरे (वय 35, रा. घर क्र. 1444, न्यू नंदनवन लेआउट, नागपूर) या आरोपीच्या घरावर छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी एक मॅगझिनसह अग्निशस्त्र (किंमत 50,000), एक जिवंत काडतूस (1,000) आणि मोबाईल फोन (10,000) असा एकूण 61,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अप. क्र. 570/25 अंतर्गत कलम 3/25 आर्म्स अॅक्ट सह 135 बीपी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत एपीआय नन्नावरे, महिला हेड कॉन्स्टेबल आरती, एनपीसी सेसरा राऊत, पीसी अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वसने आणि कुणाल बोधखे यांनी सहभाग घेतला.गुन्हे शाखेच्या दक्ष कारवाईमुळे नंदनवन परिसरातील गुन्हेगारी हालचालींना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







