Shopping cart

  • Home
  • News
  • ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतावर सायबर हल्ल्यांचा पाऊस; पाकिस्तानसह पाच देशांचा सहभाग

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतावर सायबर हल्ल्यांचा पाऊस; पाकिस्तानसह पाच देशांचा सहभाग

May 13, 20251 Mins Read
58

India Morning News

Share News:
Share

नवी दिल्ली:

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला असून, यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी केंद्रांवर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानकडूनही सीमाभागात गोळीबार करण्यात आला, ज्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या घडामोडी दरम्यान भारतावर तब्बल १५ लाख सायबर हल्ले करण्यात आले.

भारतीय सायबर सुरक्षेच्या मजबूत यंत्रणेने यातील बहुतांश हल्ले निष्फळ ठरवले. केवळ १५० हल्ले रोखता आले नाहीत. हे हल्ले पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियातील काही देशांतून करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. युद्धविराम असतानाही पाकिस्तानमधील सायबर हॅकर्स भारत सरकारच्या विविध वेबसाईट्सना लक्ष्य करत आहेत.

महाराष्ट्र सायबर विभागाने या संदर्भात माहिती दिली असून, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमान वाहतूक व्यवस्था, महापालिका प्रणाली आणि निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हल्ला झाल्याच्या अफवांना त्यांनी साफ नकार दिला आहे.

सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या माहितीविरोधात मोहिम राबवली जात असून, आतापर्यंत ८३ पैकी ३८ बनावट पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. नागरिकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी १९४५ आणि १९३० हे हेल्पलाइन क्रमांक कार्यरत असून, दररोज सुमारे सात हजार कॉल्स या नंबरवर येतात. सायबर फसवणुकीमुळे होणारे नुकसान रोखून २०१९ पासून सुमारे ६०० कोटी रुपये वाचवण्यात यश आले असून, यातील २०० कोटी फक्त गेल्या सहा महिन्यांत वाचवले आहेत.

राज्य सरकारच्या अखत्यारीतील महाराष्ट्र सायबर विभाग सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी प्रमुख नोडल एजन्सी आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, युद्धविरामानंतर सायबर हल्ल्यांची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरीही हल्ले पूर्णपणे थांबलेले नाहीत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share