India Morning News
नागपूर, दि 8 : कार्यालयीन कामामध्ये सुलभता येण्याच्या उद्देशाने आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या (एआय) वापराबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयेाजित करण्यात आले. एक्सेल, पॉवर पाँइंट प्रेझेंटेशन, ई-मेल आदींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागांना दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आरखड्यांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता एआय वापराबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. व्हिएनआयटीच्या प्रा. डॉ. पुनम शर्मा यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. विभागीय आयुक्तालयातील महसूल अपर आयुक्त राजेश खवले, सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजुसिंग पवार, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विकास आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, प्रादेशिक चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान प्रा. डॉ. शर्मा यांनी उपलब्ध एआय टुल्स आणि त्यांचा शासकीय कामकाजासाठी प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले. एआय तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती देतांना याच्या वापराबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत त्यांनी सांगितले. एआय टुल्सचा वापर करून एक्सेल फाईल, पॉवर पाँईट प्रेझेंटेशन, ई-मेल, अनुवाद आदींचा कार्यालयीन कामामध्ये प्रभावी उपयोग करण्याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षणामागील भूमिका मांडली तर नियोजन उपायुक्त अनिल गोतमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.







Comments are closed