Shopping cart

  • Home
  • News
  • आळंदीतील हरिनाम सप्ताह सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग; इंद्रायणी स्वच्छतेसाठी ठोस पावले

आळंदीतील हरिनाम सप्ताह सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग; इंद्रायणी स्वच्छतेसाठी ठोस पावले

May 10, 20251 Mins Read
285

India Morning News

Share News:
Share

आळंदी: पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी जमलेल्या हजारो वारकरी बंधू-भगिनींशी संवाद साधत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्याला साष्टांग दंडवत घालत कौतुक केले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, भागवत धर्माचा विचार आणि महान परंपरेची पालखी खांद्यावर घेऊन संत ज्ञानेश्वरांनी समाजाला दिशा दिली. “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला ७५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेले सात दिवस आळंदीमध्ये सुरू असलेला हरिनाम सप्ताह आणि त्यात सहभागी झालेले हजारो वारकरी यांचे कौतुक वाटते. या सोहळ्याला उपस्थित राहणे हे माझे भाग्य आहे,” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आळंदी ही ज्ञानभूमी असून यापूर्वीही अनेकदा येथे येण्याचे सौभाग्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्ञानेश्वरी ग्रंथातून मानवता, सेवाभाव आणि योगसाधनेचे महत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न संतांनी केला, यामुळेच हा ग्रंथ आजही प्रासंगिक आहे, असे शिंदे यांनी सांगितले. आषाढी वारीदरम्यान ज्ञानोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्याची प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “राज्य शासनाने हे काम हाती घेतले आहे. यासाठी आळंदीत एसटीपी (Sewage Treatment Plant) उभारला जाईल. केंद्र आणि राज्य शासनासोबतच वारकऱ्यांचे सहकार्यही यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते मिळेल, याची खात्री आहे.”
असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मंदिर समितीच्या ४५० एकर जागेत ‘ज्ञानभूमी’ उभारण्याचा मानस असून, त्यासाठी टप्प्याटप्प्याने विकास करण्यास सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. तसेच, मंदिर परिसरात भक्त निवास उभारण्यासाठी नगरविकास विभागामार्फत २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे, उत्तम जानकर, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, माधवदास राठी महाराज, प्रमुख विश्वस्त योगी निरंजनदासजी, चैतन्य महाराज कबीर, रोहिणीताई पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी उपस्थित होते.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share