India Morning News
बीड : मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मंत्रिपदाचा राजीनामा देणारे धनंजय मुंडे महाराष्ट्र दिनी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. परळी तहसील कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजवंदन सोहळ्याला त्यांनी उपस्थित राहून आपले पुनरागमन केले.
ध्वजवंदनाने सुरू झाला नव्या उपस्थितीचा टप्पा
राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांनी आज सकाळी ८.०५ वाजता परळीतील तहसील कार्यालयात ध्वजवंदन केले. काही काळ प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले मुंडे हे अचानक समोर आल्यानंतर त्यांच्या सक्रियतेची नवी चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, विभागीय प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले होते. मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सात जणांना अटक करण्यात आली असून, काही धक्कादायक छायाचित्रे समोर आल्याने या प्रकरणाने वेग घेतला होता. या दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
जालना येथे पंकजा मुंडेंकडून ध्वजवंदन
दुसरीकडे, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर ध्वजवंदन केले. या सोहळ्यात खासदार डॉ. कल्याण काळे व आमदार अर्जुन खोतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत, पोलीस महासंचालक पदक प्राप्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला.






Comments are closed