India Morning News
मुंबई – राज्याच्या राजकारणात एक धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हत्या होण्याचा कट रचला होता, पण दिवंगत भय्यूजी महाराज यांच्या हस्तक्षेपामुळे ते वाचले, असा खळबळजनक दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे.
मुंडे दोन दिवसांपूर्वी गंगाखेड येथे राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना गुट्टे यांनी विरोधकांना कडाडून प्रत्युत्तर दिले.
गुट्टे म्हणाले की, तुम्ही माझ्या विरोधात अनेक प्रयत्न केले, पण गंगाखेडच्या जनतेने मला प्रचंड मतांनी विजयी केले. मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो, पण धनंजय मुंडे यांचा निकाल मीच लावणार आहे.
त्यांनी पुढे असा दावा केला की, धनंजय मुंडेंवर इंदूरमध्ये खून होण्याचा कट रचला होता, पण भय्यूजी महाराजांनी त्यांना वाचवले.
गुट्टे म्हणाले की, गंगाखेड साखर कारखान्याचे कर्ज फेडले गेले असून शेतकऱ्यांच्या नावावर कोणतेही कर्ज शिल्लक नाही. जर काही शेतकऱ्यांना सिबिल समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर त्यासाठीही मी मदत करत आहे.
शेवटी गुट्टे यांनी धनंजय मुंडेंना सवाल केला, जर माझा आरोप खोटा असेल तर तुम्ही राजकारणातून संन्यास घेणार का?



