India Morning News
कामठी : कामठी-कलमना मार्गावरील अवैध कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रणाळा गावातील सरपंच पंकज साबळे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी यावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पहाटेपासून सकाळपर्यंत धावणाऱ्या अवजड ट्रकमधून कोळसा सांडल्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही धूळ हवेच्या प्रवाहात मिसळून परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण करत आहे.
रस्त्यावर उधळतोय कोळसा, नागरिक त्रस्त
दररोज पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत १४ आणि १६ चाकी ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक कोळसा वाहून नेण्यात येतो. ब्रेकर्स किंवा अचानक ब्रेक लावल्यानंतर हे ट्रक रस्त्यावर कोळसा सांडतात. परिणामी, सांडलेला कोळसा सूक्ष्म धुळीत रूपांतरित होतो आणि हवेत मिसळतो. या धुळीमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची तसेच रस्त्यालगत राहणाऱ्यांची आरोग्ये धोक्यात आली आहेत. येरखेडा परिसरातील नागरिकांना श्वसनविकार, अस्थमा, फुफ्फुसांचे आजार आणि ‘ब्लॅक लंग डिसीज’सारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
कोळसा वाहतूक ‘आऊटर रिंग रोड’च्या ऐवजी शहराच्या अंतर्गत मार्गावरून करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. टोल टाळण्यासाठी किंवा पोलिसांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने ही वाहतूक होत असल्याचा शंका व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे संबंधित वाहतूक पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा
या प्रकारासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रणाळा ग्रामपंचायतीमार्फत निवेदन देण्यात आले आहे. सरपंच पंकज साबळे, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वाक्षरी केलेल्या या निवेदनात तातडीने कोळसा वाहतूक रोखण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
कामठी-कलमना रस्त्यावर अवैध कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, ग्रामस्थांनी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविरोधात ठाम भूमिका घेत तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.







Comments are closed