India Morning News
काबूल : अफगाणिस्तानात आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांना हादरवून सोडलं. या भूकंपाचे धक्के अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या भागात प्रकर्षाने जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
आज, १९ मे रोजी सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी भूकंपाचा झटका बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवली गेली असून, केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे १४० किलोमीटर अंतरावर होता.
चार दिवसांतील चौथा भूकंप-
अफगाणिस्तानात गेल्या चार दिवसांत हे भूकंपाचे चौथे प्रकरण असून, या सलग घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा भाग भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या संपर्करेषेवर स्थित असल्याने अशा हादर्यांची शक्यता अधिक असते. विशेषतः हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये या प्लेट्सच्या हालचालीमुळे वारंवार भूकंप निर्माण होतो.
चीन आणि तुर्कीतही भूकंपाचे धक्के-
चीन आणि तुर्कीतही भूकंपाचे धक्केया पार्श्वभूमीवर, गुरुवारी चीन आणि तुर्कीमध्येही भूकंपाच्या हालचाली नोंदवण्यात आल्या. चीनमध्ये पहाटे साडे तीनच्या सुमारास जमिनीला हादरे बसले. त्या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलवर मोजली गेली. भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीच्या १० किलोमीटर खोलवर होते, असे सांगण्यात आले आहे.
त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास तुर्कीमध्येही भूकंपाचा धक्का बसला. तुर्कीतील भूकंप ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, जो तुलनेने अधिक जोरदार मानला जातो.एकाच आठवड्यात विविध देशांमध्ये भूकंप होणं ही चिंतेची बाब आहे. भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतत सतर्क राहणे आणि आपत्कालीन उपाययोजना तयार ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.







Comments are closed